Sunday 1 October 2017

(ब्लाॅगचा श्रीगणेशा एका विडंबनाने करूया जे कि आधी माझ्या फेबु प्रोफाईलवर पुर्वप्रकाशित केलं आहे.संदीप खरेंची माफी मागून"अताशा असे हे मला काय होते"या कवितेचे विडंबन.)

अताशा असे हे मला काय होते?
कुण्या कोंबडीचे चिकन ताटात येते
बरा खाता-खाता स्तब्ध होतो
कशी शांतता शून्य पोटात येते

कधी दाटू येता गंध तांबड्या-पांढर्याचा
कसा हावरा रंग होतो मनाचा
असे हालते पोटात हळुवार काही
जसा स्पर्श कांद्यावरी लिंबवाचा

न मर्यादा कुठच्या न बंधने काही
किती खायचे-प्यायचे भान नाही
जसा पेग निघतो पोटाच्या प्रवासा
ना कसले प्रमाण ना अनुमान काही

कशी ही अवस्था कुणाला कळावे
कुणाला पुसावे कुणी उत्तरावे
किती कमी करतो तरी जीव अडकतो
असा जीव अडकता कुणी सावरावे?